३५ वर्षीय सिनेट सभासद ऑसऑफ हे गेल्या तीन दशकांमधील निवडून आलेले सर्वात तरूण अमेरिकी सिनेट सभासद आहेत
सिनेट सभासद ऑसऑफ: “मी आमच्या देशांमधील मैत्रीचे नाते अधिक बळकट करण्यासाठी व भारताच्या पुढच्या पिढीतील नेत्यांना भेटण्यासाठी येत आहे”
पहा: सिनेट सभासद ऑसऑफ यांनी भारतीय स्वातंत्र्याचा ७५वा वर्धापनदिन साजरा करणाऱ्या भारतीय जनतेसाठी अलिकडेच पाठविलेला व्हिडिओ संदेश
अटलांटा, जीए. — अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याचे, सिनेट सभासद ज़ॉन ऑसऑफ यांनी जाहीर केले की ते भारतामध्ये येणाऱ्या आठ-दिवसीय आर्थिक शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. या शिष्टमंडळाचे ३० ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये आगमन होईल व ६ सप्टेंबर २०२२ रोजी ते नवी दिल्लीहून परत जातील.
“मी आमच्या देशांमधील मैत्रीचे नाते अधिक बळकट करण्यासाठी व भारताच्या पुढच्या पिढीतील नेत्यांना भेटण्यासाठी येत आहे,” असे सिनेटर ऑसऑफ म्हणाले. “आम्ही ज़ॉर्जियातील भारतीय वंशाच्या अमेरिकी समुदायाचे प्रतिनिधित्व करण्याचेही काम करू, जेथे भारतीय वंशाच्या लोकांची अतिशय भरभराट होतेय व आमच्या समुदायाला त्यांच्याविषयी अतिशय आपुलकी वाटते.”
३५ वर्षीय सिनेट सभासद ऑसऑफ हे गेल्या तीन दशकांमधील निवडून आलेले सर्वात तरूण अमेरिकी सिनेट सभासद आहेत. आपल्या भेटीदरम्यान, सिनेट सभासद ऑसऑफ अमेरिका व भारतादरम्यानचे आर्थिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक व सुरक्षा संबंध बळकट करण्याचे काम करतील. सिनेट सभासद ऑसऑफ अमेरिकी सिनेटमध्ये ज्या जॉर्जिया राज्याचे प्रतिनिधित्व करतात, तेथे एका लाखाहून अधिक भारतीय वंशाचे अमेरिकी राहतात.
सिनेट सभासद ऑसऑफ यांनी या आठवड्यामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा ७५वा वर्धापनदिन साजरा करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी एक संदेश पाठवला ज्यामध्ये त्यांनी दोन्ही देशामध्ये वृद्धिंगत होत असलेल्या नात्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
सिनेट सभासद ऑसऑफ यांनी सिनेट सभासद म्हणून निवडून येण्याआधी, आंतरराष्ट्रीय वृत्त संस्थांसाठी भ्रष्टाचार,युद्धातील गुन्हे व दहशतवाद यासंदर्भातील तपास केला व असे प्रकार उघडकीला आणले. २०२१ सालच्या महत्त्वाच्या निवडणुकीत ते निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात नसतानाही ते निवडून आले ज्यामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला सिनेटमध्ये बहुमत मिळाले.
सिनेट सभासद ऑसऑफ यांनी त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळामध्ये नागरी हक्क बळकट करण्यासाठी, देशांतर्गत सौर ऊर्जा उत्पादनास चालना देण्यासाठी व सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी विविध कायद्यांचा मसुदा तयार करणे व त्यास मंजूरी मिळण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्याचप्रमाणे सिनेटच्या तपासासाठीच्या स्थायी उपसमितीचे अध्यक्ष म्हणून शोषण व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या द्विपक्षीय तपासाचे नेतृत्वही केले आहे.